करोनाच्या महामारीमुळे जगभरातील नागरिकांना पळता भुई थोडी झाली आहे. या स्थितीत मूळ नाशिक जिल्ह्यातील असणाऱ्या किंवा नाशिकशी जवळचे नाते असणाऱ्या सुमारे ५५३ नागरिकांनी आठवडाभरापासून जिल्ह्यात हजेरी लावत येथे तळ ठोकला आहे. विशेष म्हणजे जगभरात करोना संसर्गाचा मोठा फटका बसलेल्या देशांमधून आलेल्या नागरिकांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये सर्वाधिक नागरिक दुबईतून, तर सर्वांत कमी नागरिक चीनमधून आल्याचे आतापर्यंत प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
करोनाचे महाभयंकर स्वरूप लक्षात आल्यानंतर मूळ भारतीय असणाऱ्या नागरिकांनी शक्य तितक्या लवकर मायदेशाकडे धाव घेतली आहे. प्रत्येकाने आपापल्या मूळ गावी आश्रय घेण्यास प्राधान्य दिल्याने संचारबंदी लागू केल्यापासून शुक्रवारी दुपारपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये सुमारे ५५३ नागरिकांनी विविध करोनाग्रस्त देशांमधून आश्रय घेतला आहे. यापैकी परदेशातून आलेल्या या नागरिकांमधून आतापर्यंत १४१ जणांचे १४ दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. दैनंदिन सर्वेक्षणांतर्गत अद्याप ४१२ परदेशातून आलेले नागरिक यंत्रणेच्या निगराणीत आहेत. शहरामध्ये बुधवारी रात्री उशिरापर्यंत दुबईतून आलेल्या सहा नागरिकांची नोंद करण्यात आली होती. याशिवाय अमेरिकेतून १, इंग्लंडमधून ३, सौदी अरेबियातून ३ नागरिकांची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय इतर विविध देशांमधून २० नागरिक परदेशातून नाशिक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. गुरुवारी संख्या ७६ च्या घरात होती. या संख्येत शुक्रवारी रात्री उशिरा आणखी भर पडली. परदेशातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकावर प्रशासन कटाक्षाने नजर ठेवून आहे. नियमानुसार प्रत्येक नागरिकाची कसोशीने तपासणी व चौकशी होत असून, प्रक्रियेनुसार या नागरिकांना आवश्यक त्या सूचना देण्यात येऊन निगराणीत ठेवले जात आहे.
पाचशेवर पाहुण्यांचा नाशिकमध्ये मुक्काम